Breaking

सुरक्षा ठेवीवर परिमंडळातील वीज ग्राहकांना १३ कोटी ९६ लाखाचा परतावा*

बुलडाणा(प्रतिनिधी),दि.०२ ऑगष्ट २०२४:
महावितरणकडे जमा असलेल्या वीजबिलांच्या सुरक्षा ठेवीवर अकोला परिमंडळातील १३ लाख ५१ हजार ४७० विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १३ कोटी ९६ लाख ३० हजार ९७६ रुपयाचे व्याज देण्यात आले आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आलेली आहे.

अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील यात ०४ लाख ६५ हजार ४४१ वीज ग्राहकांचा समावेश असुन त्यांना ०५ कोटी ५३ लाख ९७ हजार ७६९ रूपये,तसेच बुलडाणा जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार ८३० वीज ग्राहकांना ०५ कोटी ८८ लाख १३ हजार १५२ रूपये आणि वाशीम जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार १९९ वीज ग्राहकांना २ कोटी ५४ लाख २० हजार रूपये सुरक्षा ठेवीवर व्याज देण्यात आले आहे.
*काय असते सुरक्षा ठेव* :-

सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतली जाते? त्यावर व्याज मिळते का? असे एक नाही तर असंख्य प्रश्न सामान्य वीजग्राहकाला नेहमीच पडत असतात. मुळात महिनाभर वीज वापरल्यानंतर ग्राहकांना महावितरण वीजबिल देते. ते भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत देते. मुदत संपल्यानंतरही बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी १५ दिवसांची नोटीस देते. हा सर्व कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार हमी म्हणून ग्राहकांकडून मागील वार्षिक वीज वापराच्या/ वीज देयकाच्या सरासरीच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव वार्षीक सरासरीच्या दीडपट करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
*सुरक्षा ठेविचे पुनर्निधारण :-*

महावितरण वर्षातून एकदा वीजवापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निधारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील दोन महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीज वापर यामुळे वीज बिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा महावितरणकडे भरणा केला नसेल त्यांची ती थकबाकी सुरक्षा ठेवीतील व्याजामधून वळती करण्यात येते. ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही विद्युत नियामक आयोगाचे प्रावधान आहेत.
महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करताना ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केली जाते.तसेच महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर दरवर्षी महावितरणकडून एप्रिल,मे किंवा जून महिन्याच्या वीज बिलात या सुरक्षा ठेवीवर व्याज दिले जाते.यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा वेळोवेळी भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.