Breaking

मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे..

शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे अभिजात मराठी सप्ताह साजरा*

*शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे अभिजात मराठी सप्ताह साजरा*

शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव येथे दिनांक ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “अभिजात मराठी सप्ताह” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करणे आणि तिच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा गौरव साजरा करणे हा होता. या अनुषंगाने संस्थेत मराठी भाषेवर आधारित अभिवाचन स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, मराठी शब्दसंपदा स्पर्धा, रेखाटन स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या मायमराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले.

या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिका तथा कवियत्री मा.डॉ अलका बोर्डे मुख्याध्यापिका श्रीमती आशाताई बोर्डे माध्यमिक विद्यालय, बोरगाव मंजू तथा यशदा पुणे व दूरदर्शन सह्याद्री वाहिनी मराठी तज्ञ मार्गदर्शिका यांची उपस्थिती लाभली होती. त्यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून मराठी भाषेचे वैभव, साहित्यिक परंपरा आणि आधुनिक युगातील भाषेचे संवर्धन यावर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयी नवी उमेद आणि जाणीव निर्माण झाली. त्यांच्या वऱ्हाडी हास्यकविता सादरीकरणाने कार्यक्रमात वेगळीच लज्जत निर्माण झाली.

आपल्या अध्यक्षीय समारोपादरम्यान संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाचे कौतुक केले तसेच “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून, ती आपल्या विचारांची, संस्कृतीची आणि आत्मसन्मानाची ओळख आहे. विद्यार्थी मराठी भाषेचे जतन करतील तेव्हाच आपल्या समाजाचीओळख अधिक समृद्ध बनेल” असे प्रतिपादित केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेच्या मराठी कक्षाने केले. याकरिता कु कादंबरी आचार्य, ओम करवंदे, गौरी वाळके, शिवानी नगरे, यांसह अनेक विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे सप्ताह अविस्मरणीय ठरला. “मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे,” या भावनेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा गजानन पदमणे (विभागप्रमुख यंत्र अभियांत्रिकी) यांनी सादर केले तर आपल्या समृद्ध वाणीने प्रा राजेश मंत्री यांनी आभार व्यक्त केले. याकरिता प्रा.संदीप परांजपे (विभागप्रमुख संगणक), प्रा प्रवीण चोपडे, प्रा अंकुश दवंड, प्रा गौरव भोयर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्गाची उपस्थिती लाभली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची ओढ, अभिमान आणि साहित्यिक जाण अधिक दृढ झाल्याचे जाणवले. सदर माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख प्रा राजेश मंत्री यांनी कळविलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.