Breaking

रोटरी क्लबव्दारे खामगांवद्वारे व्यक्तिमत्व विकास शिबिर रायलाचे आयोजन संपन्न*

*रोटरी क्लबव्दारे खामगांवद्वारे व्यक्तिमत्व विकास शिबिर रायलाचे आयोजन संपन्न*

रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्डस (RYLA) हा रोटरी क्लबद्वारे आयोजित केलेला एक गहन नेतृत्व अनुभव आहे जिथे तुम्ही तुमचे नेतृत्वगुण कौशल्ये विकसित करू शकता आणि भविष्यातील भावी नेतृत्वाला वास्तविक जगात येणाऱ्या अडथळ्यांना कसे हाताळायचे हे शिकविण्यात मदत होते. रोटरीने याद्वारे तरुणांना महत्त्वाची जीवनमूल्ये शिकवलेली आहेत. यामध्ये परस्पर संवाद, टीम बिल्डिंग, ग्रुप समस्या सोडवणे आणि प्रोजेक्ट टीम्समधील परस्पर व्यवस्थापनासारखे उपक्रम राबविले जातात. मानसिक सक्षमतेसाठी स्वयंशिस्त, स्पष्टता, ध्येय, सातत्य आणि नियोजन या पंचसुत्रीचा अवलंब करण्याचा व आयुष्यातील चढ उतारांचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यासाठी अशी शिबीरं महत्वपूर्ण ठरतात.

असाच एक उपक्रम रोटरी क्लब खामगावद्वारे स्थानिक गो से महाविद्यालयात दिनांक १७ व १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये खामगांव शहर व ग्रामीण, शेगांव आणि नांदुरा येथील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातील आठवी ते बारावी पर्यंतच्या वयोगटातील ६२ विद्यार्थ्याचा प्रशिक्षणार्थी म्हणून समावेश करण्यात आला होता. प्रशिक्षक म्हणून नागपूर येथील सुप्रसिद्ध ट्रेनर मुकेश आशर व निलेश लांजेवार हे लाभले होते. या शिबिराला सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस यांचे प्रायोजकत्व होते.

उद्घाटन समारंभ १७ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ०९.३० वाजता सुरु झाला. यावेळेस मंचावर प्रमुख पाहुणे सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा अशोक कंकाळे, मुख्य निमंत्रित गो से महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तळवणकर, रोटरी क्लब अध्यक्ष विजय पटेल, सचिव किशन मोहता, शिबीर प्रकल्पप्रमुख प्रा निशांत गांधी, सहप्रकल्पप्रमुख सौरभ चांडक, ट्रेनर मुकेश आशर व निलेश लांजेवार हे उपस्थित होते. सचिव किशन मोहता यांनी प्रमुख पाहुण्यांचा सभेस परिचय करून दिला. यावेळेस मंचकावरील सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची आवश्यकता व त्यातून उज्वल भविष्याची होणारी पायाभरणी यावर सखोल मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमाचे सुरेल संचालन सुनील नवघरे आणि सारिका नवघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ चांडक यांनी केले.

सर्व सत्रांमध्ये प्रशिक्षकांनी वेगवेगळ्या खेळांद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबतच भरपूर मनोरंजनाचेदेखील आयोजन केलेले होते ज्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी सर्वच सत्रांचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला ज्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे उत्कृष्टरीत्या प्रदर्शन केले. दोन दिवसीय प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाश्ता, भोजन व हाय टी रिफ्रेशमेंटची सोय रोटरी क्लबदवारेच करण्यात आली होती.

समापन समारंभ १८ ऑगस्ट रोजी संपन्न झाला ज्यामध्ये “प्रमुख पाहुणे” म्हणून सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसचे चेअरमन व रायलाचे प्रायोजक श्री सागरदादा फुंडकर व “गेस्ट ऑफ ऑनर” म्हणून सिल्व्हरसिटी हॉस्पिटल खामगांवचे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर हे लाभले. दोघांनीही विद्यार्थ्यांना प्रसंगाला साजेसं मार्गदर्शन दिले. दोन दिवसीय या शिबिरात विभागलेल्या ५ समूहांपैकी “उडान” या समूहाला “बेस्ट ग्रुप” चे प्रथम बक्षीस आणि “उम्मीद” या समूहाला “बेस्ट ग्रुप” चे द्वितीय बक्षीस प्रदान करण्यात आले तर व्यक्तिगत स्तरावर धृव पुरवार याला “उत्कृष्ट सहभागी (पुरुष)” आणि कु. मृणाली नरवाडे हिला “उत्कृष्ट सहभागी (स्त्री)” याप्रमाणे पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन आनंद शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन किशन मोहता यांनी केले.
आपल्या पाल्यांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याकरीता आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे यश पालकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांद्वारे आयोजकांना दररोज मिळत आहे. सर्वच रोटरी सदस्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत या यशस्वीतेचे कारण असल्याचे प्रतिपादन प्रकल्पप्रमुख निशांत गांधी, सह-प्रकल्पप्रमुख सौरभ चांडक यांचेसह रोटरी क्लब अध्यक्ष विजय पटेल, मानद सचिव किशन मोहता व सहसचिव विनीत लोडाया यांनी केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.